परिमल डोहणे, चंद्रपूर: सावली शहरात दोन वर्षांपूर्वी पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेले आशिष बोरकर यांनी आपल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारीवर अंकूश लावला. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांसाठी स्वतः स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेतले. पोलिस भरतीचा सराव करणाऱ्यांना दररोज सकाळी मैदानावर जाऊन स्वत: मार्गदर्शन केले.
क्रीडांगणही तयार करण्यात मदत केली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार आशिष बोरकर यांच्या बदलीचे आदेश धडकले. ही वार्ता सावलीकरात पसरताच त्यांनी एकत्र येत ठाणेदारांना निरोप देण्याची योजना आखली. गावकऱ्यांनीच पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस स्टेज तयार केला पेंढाल टाकला. अन ठाणेदार कार्यक्रमस्थळी हजर होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या असलेल्या नागरिकांनी चक्क पुष्पाचा वर्षाव केला, अन् पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सावलीकरांच्या या प्रेमाने ठाणेदार आशिष बोरकर हे भावनिक झाले होते.
यावेळी सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील, बीडीओ मधुकर वासनिक, सावली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा लता लाकडे, नव्याने रुजू झालेले ठाणेदार जीवन राजगुरू, पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संघटनेतर्फे ठाणेदार आशिष बोरकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
ठाणेदार आशिष बोरकर हे आपल्या कर्तव्यप्रती एकनिष्ठ होते. तसेच सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यामुळे सावलीतील लहानापासून मोठ्यांपर्यंत ते लोकप्रिय होते. अशातच त्यांची बदली चंद्रपूर जिल्हा विशेष शाखेत झाल्याने सावलीकरांना मोठे दुःख झाले. त्यांनी जड अंतःकरानांनी बोरकर यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करून पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचा सत्कार केला. या निरोप समारंभाने ठाणेदार बोरकर हे भारावून गेले होते. सावली गाव व येथील नागरिक सदैव माझ्या स्मरणात राहतील अश्या प्रतिक्रिया बोरकर यांनी यावेळी दिल्या.