‘ओआरएस’ सप्ताहाचा विसर : चौकशी करण्याची अविनाश जाधव यांची मागणी राजुरा : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात ५३ आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधसाठाच नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. सध्या पावसामुळे साथीचे रोग, मलेरिया, अतिसार, ताप, लहान मुलांचे आजार वाढले आहेत. मात्र यासाठी आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाही. सध्या ओआरएस सप्ताह सुरू असून गावामधील लहान मुलांना ओआरएसची पॉकिटे वाटप करावयाची होती. परंतु, आरोग्य विभागाला या सप्ताहाचा विसर पडला असून अजूनपर्यंत ओआरएसची पॉकिटे देण्यात आलेली नाही. अतिसंवेदनशिल प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली (बु.) येथीेल मलेरिया वर्कर गैरहजर असतात. मुख्यालयी राहत नाही. दोन वर्षांपूर्वी सुब्बई येथील एक्सपायरी झालेल्या गोळ्या लहान मुलांना वाटप करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील मुलाची प्रकृती नाजुक झाली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर उपकेंद्राला नियमित भेटी देत नाही. आरोग्य शिबिरे कादागवरच असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी असते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीही आरोग्यविषयक समस्यांबाबत गंभीर नाही. जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अॅन्टेबायटीक आयड्राप, सेप्ट्रान, पॅरासिटामील, अॅम्पीसिलन, ओआरएस, बॅन्डेज पट्टया यासह अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेत सुधारणा करून औषधांचा पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
अनेक रूग्णालयात औषधांचा तुटवडा
By admin | Published: July 22, 2016 1:06 AM