अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बनवा
चंद्रपूर: शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. वर्दळीच्या अनेक मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बनवावे, अशी मागणी होत आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणा
चंद्रपूर : येथील लालपेठ, पडोली, बंगाली कॅप परिसरातून बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात; मात्र धोकादायक व वर्दळीच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. शेती हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वातील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यांवर बांधकाम साहित्य
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाचे दिवस काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑटो चालकांना अनुदान देण्याची मागणी
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे ऑटो चालकांचे जगणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात सात हजार ऑटोरिक्षा चालक आहे. सध्यस्थितीत प्रवासीच नसल्याने व्यवसाय होत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने किमान दहा हजार रुपये मदत करावी, अशी मागणी ऑटोचालकांनी केली आहे.
बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
चंद्रपूर : शहरातील गोल बाजार, गांधी चौक, बंगाली कॅम्प, तुकूम, एसटी वर्कशॉप, जटपुरा गेट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गोल बाजार परिसरात बाजारपेठ असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही बाजारपेठ गजबजलेली असते. यामध्ये विक्रेत्यांसह ग्राहकही मोठ्या प्रमाणात येतात; मात्र सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून येतो. अनेकजण तर मास्कसुद्धा वापरत नाही. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मोकाट कुत्र्यांचा हैदोस
चंद्रपूर: शहरातील तुकूम परिसरात कुत्र्यांचा हैदोस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काहीवेळा तर चावा घेण्यासाठी नागरिकांच्या अंगावर सुद्धा आल्याच्या घटना घडत आहे. वेळीच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.