लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० आॅगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती १ सप्टेंबरपर्यंत सलग तीन जिल्ह्याला शासनाने अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विविध योजनांमार्फत दिलेल्या निधीचा आढावा घेणार आहे. समितीची चाहूल लागताच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह संबंधित यंत्रणांचे अधिकारी धास्तावले आहेत.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांच्यासमवेत अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व अडचणींवर अनौपचारिक चर्चा करून आपले मिशन सुरू करणार असल्याची माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. प्रा. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती येत आहे. समितीमध्ये ११ विधानसभा व ४ विधान परिषद सदस्य असे १५ आमदार आहेत. तसेच विधान मंडळाचे सुमारे १२ अधिकारी-कर्मचारी सोबत असणार आहेत. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी, नगर परिषदा, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (परिमंडळ), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महानगर पालिका, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व जिल्हा परिषदेला शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग कसा झाला यासह चंद्रपूर व चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत तालुकानिहाय आदिवासी उपयोजनांचाही आढावा घेणार आहे. यानंतर समितीचे सदस्य जिल्ह्यातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
हेडमास्तर घेणार अधिकाऱ्यांचा वर्गसमितीचे अध्यक्ष प्रा. अशोक उईके हे बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहे. त्यांच्या रुपाने आदिवासी समाजातील नवे नेतृत्त्व पुढे आले आहे. ते भाजपच्या वरिष्ठ गटातील असल्याचीही माहिती आहे.यामुळे त्यांना समिती अध्यक्षाचा मान मिळाल्याचे समजते. ते पेशाने हेडमास्तर असून अनुभवी आहे. या समितीच्या कर्तव्याबाबत ते गंभीर असल्यामुळे या दौऱ्यात ते चांगलाच ’क्लास‘ घेण्याची भीती अधिकाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.विधी मंडळाच्या समित्यांचे वरिष्ठ अधिकारी चंद्रपुरात दाखलही समिती आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात चांगलीच झाडाझडती घेण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने विधी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मंगळवार दि. २८ आॅगस्टलाच चंद्रपुरात दाखल झाले आहेत.