चंद्रपूर : ग्रामीण भागातील माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शहरी भागातील शाळा सुरू करण्यासाठी लगबग सुरू आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ३४० शाळा सुरू झाल्या असून सरासरी ३० ते ३५ हजार विद्यार्थी दररोज शाळेत जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात ८ ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काही शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झाले नाही. त्यातच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियम काही शाळांत पाळले जाते का, हासुद्धा प्रश्न आहे. विशेषत: विद्यार्थ्यांचे लसीकरणही झाले नाही. शाळा सुरू झाल्याचा पालकांसह विद्यार्थ्यांना आनंद आहे. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे पालकांना पाल्यांच्या आरोग्याची चिंताही सतावत आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात ३४० शाळा सुरू
बाॅक्स
जिल्ह्यात सध्या माध्यमिकच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू असल्या तरी काही विद्यार्थी अद्यापही शाळेत जातच नसल्याचे चित्र आहे.
बाॅक्स
सॅनिटायझर करा, पैसे देणार कोण?
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करण्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. हे पैसे कोण देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. शासनाच्या वतीने शाळांना पैसे देण्यात आले असले तरी ते फारच अल्प आहे. त्यामुळे यातून सॅनिटायझेशन करणे कठीण आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक आपल्या खिशातून पैसे काढून शाळांत सुविधा पुरवीत आहेत.
बाॅक्स
मुख्याध्यापकांना पेच
शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींचा ठराव घ्यावा लागतो; परंतु ज्या ग्रामपंचायतींनी शाळा सुुरू करण्याचा ठराव दिलेला नाही, अशा गावांमध्ये समस्या निर्माण होत आहे. शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासाठी जोर देत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक चांगलेच अडचणीत आले आहेत.
कोट
शासनाने ठरवून दिलेल्या प्रत्येक नियमाचे शाळांमध्ये काटेकोरपणे पालन केले जात आहे. सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थ्यांना वर्गात बसविले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली जात आहे.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि.प., चंद्रपूर