चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षीही सत्र सुरू होऊन विद्यार्थ्यांविनाच शाळा सुरू आहे. मध्यंतरी शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला. यामुळे पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा शासन निर्णय बदलवित आता शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांची घंटा आता ग्रामपंचायतीच्या ठरावावर अवलंबून आहे.
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील वर्षी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, तर २७ जूनपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना वर्गोन्नत करण्यात आले. यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही शाळा मात्र विद्यार्थ्यांविना सुरू आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले होते. काही दिवसांतच आदेश बदलवित कोरोनाची स्थिती, कोरोनामुक्त गाव बघून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातही ग्रामपंचायतीचा ठराव तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासंदर्भात पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेतील, त्याच गावात आता शाळा सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांबाबत अद्यापतरी कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करावा लागणार आहे.
कोट
जिल्ह्यातील एकूण शाळा - २५०४
शासकीय शाळा - १६३७
अनुदानित शाळा -४८९
विनाअनुदानित शाळा - ३७८
जिल्ह्यातील एकूण गावे - १८३६
बाॅक्स
आतापर्यंत ग्रामपंचायतींचा ठराव
शासन आदेशानंतर शिक्षण विभागाने शाळांमार्फत ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनामुक्त शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव घेण्याचे कळविले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव झाल्यानंतर त्या गावात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीने असा ठराव घेतला नसला तरी काही गावांत अशाप्रकारची तयारी सुरू करण्यात आली आहे.
बाॅक्स
शाळांना आहे आदेशाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील सर्वच गावातील शाळा सज्ज आहेत. शाळा प्रशासनाला केवळ शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. काही शिक्षक शाळेत जात असून ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू केला आहे; मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी परवानगी नाही. शिक्षक जमेल त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बाॅक्स
पालकांचीही हां
मागील सत्रापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावात शाळा सुरू करण्यास काहीही हरकत नाही. यासाठी शासनाने ग्रामपंचायत किंवा शिक्षण विभागाकडे जबाबदारी न सोपविता कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचे आदेश द्यायला पाहिजे.
-संदीप खुटेमाटे
सदस्य, ग्रा.पं. पिपरी दे.
बाक्स
कोरोना संकट आता कमी झाले आहे, त्यामुळे गावातील शाळा तसेच शहरातील काही वर्ग सोशल डिस्टन्सचे नियम पाळून सुरू करण्यास काहीच हरकत नाही. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनाही ताण आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याची सर्वांना आता चिंता सतावत आहे. यामुळे शाळा सुरू करणेच योग्य ठरेल. यासाठी ग्रामपंचायतच्या ठरावाची काहीच गरज पडू नये.
-पारस पिंपळकर
संपर्क प्रमुख,
अखिल भारतीय सरपंच परिषद.