लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कानपा येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी २०० ते २५० किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके पोहचवून दिली. त्यांचा हा उपक्रम कोरोना काळात प्रशंसनीय ठरला आहे.तालुक्यातील कानपा येथे मातोश्री लक्ष्मीबाई आदिवासी प्राथ व माध्य.आश्रम शाळा तसेच स्व.वासुदेवराव पाथोडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे. यात एकूण ४०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यसरकारने १५ मार्चपासून शाळा बंद केल्या तर केंद्र सरकारने २३ मार्चपासून देशात टाळेबंदी केली असल्याने शाळा बंद आहेत.
या शाळेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, सिरोंचा, आरमोरी, वडसा, एटापल्ली तालुक्यातील ८५ गावातील २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिशय सुसज्ज इमारत, राहण्याची व शिक्षणाची उत्तम व्यवस्था, यामुळे या आश्रमशाळेत दुरुदुरुन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने सरकारने वेळोवेळी टाळेबंदी वाढवली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संस्थेचे अध्यक्ष गजानन पाथोडे यांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी समुपदेशकांची नियुक्ती करून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून शैक्षणिक मार्गदर्शन सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करून ज्या भागात नेटवर्कची सेवा उपलब्ध आहे, अशा भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचेही काम सुरू आहे.
जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याचा धाडसी उपक्रम हाती घेण्यात आला व यशस्वी करण्यात आला. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पोहचवत असताना अनेक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी शिक्षकांना स्थानिक लोकांची मदत घेत नदी, नाले डोक्यावर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन पार करावे लागले. तर काही दुर्गम व डोंगराळ भागात ४ ते ५ किलोमीटर डोक्यावर पुस्तके घेऊन पायपीट करत विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचावे लागले. यात पालक व विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांना सहकार्य केले.