चंद्रपूर : शाळेला दांडी मारली, ही बाब आईला माहिती झाली तर आई रागवेल, त्यामुळे ११ वर्षीय शाळकरी मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. चित्रपटाला साजेसा असा हा प्रकार पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. परंतु, मुलाच्या बयाणावरून पोलिसांना संशय आला. त्याला विचारपूस केल्यानंतर आई रागवेल म्हणून अपहरणाचे नाटक केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
येथील लहूजी नगरातील दाम्पत्याने ११ वर्षीय मुलासह २८ जुलैला पडोली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. मुलाने अतिशय धीरगंभीर पद्धतीने एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून दोन जणांनी आपले अपहरण केल्याचे सांगितले. चंद्रपूरच्या दिशेने ही कार जात असताना त्यांच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यामुळे कुटुंबीय घाबरले तथा पोलिसांनीही दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने चांगलाच धसका घेतला.
मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. महामार्गावर तपासणी करण्यात आली. ‘सीसीटीव्ही फुटेज’ शोधल्यानंतरदेखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. विशेष म्हणजे, मुलाने सांगितलेला वेळ व दिवस ‘सीसीटीव्ही’त बघितला असता त्यात कुठेही अपहरणकर्त्यांचे वाहन किंवा मुलगा दिसून आला नाही. अखेर काही वेळानी ठाणेदार महेश कोंडावार यांनी त्याला विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कथा समोर आली. शाळेला दांडी मारून मुलगा घरी परत आल्याने आईने त्याला कारण विचारले. आई रागावू नये, म्हणून त्याने आपले अपहरण झाल्याचे आईला सांगितले. हे ऐकून आईला धक्का बसला. मात्र, हे अपहरण नाट्य त्याने स्वत:च रचले होते.