कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापरासून शैक्षणिक सत्र सुरूच झाले नाही. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा काेरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, मार्च महिन्यात तर बाधितांचा आकडा चांगलाच फुगला आहे. परिणामी, मुले पुन्हा घरात बंदिस्त झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मैदानी खेळांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मुले अधिक वेळ घरातच राहत असून मोबाइल, संगणक, टी.व्ही. हेच जणू त्यांचे विश्व बनले आहे. मोकळे खेळायची मुभा नसल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. त्यातच वेळेचे बंधन नसल्यामुळे केव्हाही खाणे-पिणे सुरू असल्याने त्यांच्या वजनात वाढ होत आहे. मुलांच्या वयोमानानुसार वजन वाढायला हवे, अन्यथा काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे विशेषत: पालकांनी या आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बॉक्स
मुलांनी हे करावे
सकाळी लवकर उठावे तसेच रात्री लवकर झोपावे. शारीरिक हालचाल करण्यासाठी घरासमोरील मोकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा. मैदानी खेळ खेळावेत. जेवणाची वेळ निश्चित करावी. कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे घरातच राहावे लागणार. अशा स्थितीत मुलांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. वेळेनुसार जेवण करावे, चटपटीत पदार्थ खाणे टाळावे.
मुलांनी हे करू नये
मोबाइल, संगणक आणि टी.व्ही.चा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिक वेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंकफूडचे सेवन पूर्णत: टाळायला हवे. जास्तीतजास्त ७ तास झोप घ्यावी. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून न राहता घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळावे. शारीरिक हालचाल सतत करावी.
बाॅक्स
सकाळी उठणे, शाळेत जाणे, दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानात जाऊन खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री लवकर झोपणे असा लाॅकडाऊनपूर्वी मुलांचा दिनक्रम होता. लॉकडाऊनमुळे मुलांच्या वेळापत्रकात अनियमितता आली आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झोपण्याची, जेवणाची वेळ निश्चित राहिलेली नाही. यामुळेही मुलांच्या वजनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच मुलांमध्ये काही प्रमाणात चिडचिडेपणाही वाढत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना अधिकाधिक वेळ मैदानी खेळाकडे वळवावे.
- डॉ. गोपाल मुंधडा,
बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर