चंद्रपूर: विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांनी शुक्रवारी मोर्चा काढून लोकप्रतिनिधींच्या घरांवर धडक दिली. आयटक संघटनेने या मोर्चाचे नेतृत्व केले.शालेय आहार शिजविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी खासदार हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार नाना श्यामकुळे यांच्या घरावर मोर्चा नेला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोर्चाला सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारले. शालेय आहार कर्मचारी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ३० जून रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. तसेच विधानसभेतही हा प्रश्न मांडण्याचे आश्वासन यावेळी आ.मुनगंटीवार यांनी मोर्चेकरी महिलांना दिले. शासनाने २६ फेब्रुवारी रोजी काढलेला अध्यादेश रद्द करून महिलांना पुर्ववत कामावर घेण्याच्या दृष्टीने विधानसभेत आवाज उचलण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मोर्चातविविध तालुक्यातून ५०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्व विनोद झोडगे, आयटकचे जिल्हा सचिव संतोष दास, नामदेव कन्नाके, राजू गैनवार यांनी केले. (प्रतिनिधी)
शालेय पोषण आहार कर्मचारी महिलांचा मोर्चा
By admin | Published: June 28, 2014 2:29 AM