विकास खोब्रागडे
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. त्यानंतर शाळा सुरू होऊन महिना होताच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. सुट्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या. मात्र, जेमतेम महिना होत नाही तर बस कर्मचाऱ्यांनी शासनाने त्यांना शासन सेवेत विलीनीकरण करावे, या मागणीसाठी संप पुकारला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला, तरी बरेचसे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावात शाळा आहेत. मात्र, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून २२ ते २५ किलोमीटर परिसरातील मोठ्या गावात जावे लागते. यासाठी शासनाच्या एसटी सेवेचा वापर विद्यार्थी करतात.
शाळा सुरू केल्या. मात्र, बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चिमूर आगारातील ग्रामीण भागातून जाणाऱ्या बस मात्र अजूनही बंद आहेत. दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र आहे. एसटी कर्मचारी आंदोलनावर तोडगा न निघाल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग चिंतित आहे. विद्यार्थ्यांना व पालकांनाही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून संपाला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थिनींची मोठी गैरसोय
सर्वाधिक नुकसान विद्यार्थिनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शहरात कधी कधी येतात किंवा गावी जाऊ शकत आहेत. विद्यार्थिनींना मात्र अनेक मर्यादा येत असल्याने आणि पालकही धजावत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. सामान्य एस.टी.च्या फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या विद्यार्थिनींसाठीच्या बसदेखील बंद आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी एसटी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अडचणीचे ठरत आहे. काही ठिकाणी खाजगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुली व मुले शाळेत पाठविले जात आहेत.