मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट धडकले. तेव्हापासून शाळांना सुटी देण्यात आली. मध्यंतरी, आठवी ते पुढील वर्गांचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले. परंतु, तेसुद्धा काही दिवसच सुरू राहिले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर यावर्षी परीक्षासुद्धा झाल्या नाहीत. शाळाच बंद असल्यामुळे स्कूलबसही बंद आहे. परिणामी, बसचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील काही शाळा स्वत:च्या बस घेऊन त्यांचे व्यवस्थापन करतात; तर काही खासगी मालकांकडून भाड्याने बस चालविल्या जातात. मात्र, यामध्ये स्कूलबसचालकांना कामच उरले नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शाळांनी मागील वर्षी या चालकांना वेतन दिले. मात्र, यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे फी वसूलच झाली नसल्यानेे या चालकांनाही आता वेतनापासून मुकावे लागत आहे. परिणामी, अनेकांनी आता भाजीपाला, फळविक्री तसेच अन्य छोटेमोठे काम सुरू केले आहे; तर काहींनी शेतावर शेतमजूर म्हणून जाणेही सुरू केले आहे.
बॉक्स
गाडीवरील कर्ज फेडणार कसे
टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. विद्यार्थ्यांसाठी एक स्कूलबससुद्धा घेतली. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाने शाळा-महाविद्यालये बंद असल्याने स्कूलबस घरीच पडून आहे. तर, कोरोनाने बाहेर जाण्यास मुभा नसल्याने टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसायसुद्धा ठप्प आहे.
-इम्रान शेख, गाडीमालक
-----
विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बँकेतून कर्ज काढून स्कूलबस घेतली. एक वर्ष सुरळीत गेल्यानंतर कोरोना आला. मागील दोन वर्षांपासून शाळाच बंद आहेत. त्यामुळे पूर्णपणे व्यवसायच ठप्प पडला आहे. परिणामी, बँकेचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-किशोर लोणारे, गाडीमालक
------
चालकांचे हाल वेगळे
स्कूलबसवर चालक म्हणून काम करीत होतोे. मात्र, शाळा बंद झाल्याने काम बंद झाले. काही दिवस बेरोजगार होतो. आता नगरपंचायतीच्या घंटागाडीवर चालक पाहिजे असल्याची माहिती मिळताच ती गाडी चालवून उदरनिर्वाह सुरू आहे.
-मयूर दुधे, चालक
----
मागील अनेक वर्षांपासून स्कूलबस चालवून उदरनिर्वाह करीत होतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोना असल्याने स्कूलबस बंद आहेत. त्यामुळे कामही बंद आहे. रोजंदारी चालक म्हणून कधीकाळी काम मिळते. तर, बरेच दिवस मोकळे राहावे लागते.
- संघपाल रायपुरे, चालक