लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. या निर्देशाच्या अधिन राहून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेल्या शाळा व महाविद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृह व आश्रमशाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स आक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करणे आवश्यक राहील. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २२ नोव्हेंबरपर्यंत कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित रहावे.
पालकांची लेखी संमती आवश्यकविद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी या प्रकारे एक दिवसआड विद्यार्थ्यांना बोलवावे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. शाळेत जेवणाची सुटी नसेल.
असे असणार शाळेतील नियमवर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी. शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी शाळेत वावरताना त्यांनी किमान सहा फुट अंतराचे पालन करावे. विविध इयत्तांचे वर्ग सुरु होण्याच्या व संपण्याच्या वेळामध्ये किमान १० मिनिटांचे अंतर असावे. शाळेच्या परिसरात चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, ही मुख्यध्यापकांची जबाबदारी असेल. शाळेत प्रात्यक्षिक कार्ये घेताना विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत, म्हणजे शारीरिक अंतराचे पालन करणे सुलभ होईल.