संघरक्षित तावाडे
जिवती
: गेल्या दहा महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ऑनलाईन शिक्षण असले तरी जिवतीसारख्या अतिदुर्गम तालुक्यात नेटवर्क समस्या असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासाचा पुरेपूर फायदा झाला नाही. मात्र उरलेल्या दीड दोन महिन्यांत विद्यार्थ्यांना कमीतकमी गणित विषयाचा फायदा व्हावा,विद्यार्थ्यांना पाढे यावे यासाठी जिवतीचे गट विकास अधिकारी डॉ. ओम रामावत यांनी एक नवीन संकल्पना आणली आणि त्याची सुरुवातसुद्धा रविवारी बालिका दिन या दिवशी करण्यात आली आहे.
आजच्या युगात विद्यार्थ्यांपुढील आव्हाने वाढलेली आहेत. प्रतियोगिता परीक्षा हा आजच्या नव्या युगातील अत्यंत महत्त्वाचा व अनिवार्य भाग आहे. यासाठी गणित विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गणितीय संकल्पनांमध्ये व जलद गणितीय क्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर असल्यास त्याला या अभ्यासाचा लाभ मिळतो. विद्यार्थ्यांचे गणित समृद्धीकरण करण्यासाठी पंचायत समिती जिवती अंतर्गत पाढे पाठांतर हा उपक्रम ३ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात केवळ जिवती तालुक्यात राबविण्यात येत आहे.
जिवती तालुक्यातील जि. प. शाळेंचे विद्यार्थी गणित विषयात तरबेज होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. रामावत यांच्या संकल्पनेतून "मैत्री करू या पाढ्यांशी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सचिनकुमार मालवी, चरणदास कोरडे, तारा घुगुल, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती यांनी नियोजन केले आहे.
बॉक्स
उत्कृष्ट शाळांचा होणार सन्मान
या अंतर्गत इयत्ता पहिली ते दुसरीचे विद्यार्थी १ ते १० पर्यंत पाढे,इयत्ता तिसरी ते चौथीचे विद्यार्थी १ ते २०पर्यंत पाढे आणि इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी १ ते ३० पर्यंत पाढे पाठ करणार आहेत. तालुक्यातील उत्कृष्ट तीन शाळांना तसेच प्रत्येक केंद्रातील तीन शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ रामावत यांनी केले आहे.
कोट
कोरोनाच्या काळात विद्यार्थी घरी असले तरी उरलेल्या काही दिवसात त्यांचा गणित विषय भक्कम व्हावा आणि दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असणारे पाढे विद्यार्थ्यांना यावे, यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.
- डॉ ओम रामावत,
गट विकास अधिकारी,
जिवती