मूल(चंद्रपूर) : चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट ते नागाळा दरम्यान भरधाव स्कार्पिओ एका नादुरुस्त ट्रकवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात स्कार्पिओमधील सहा जण जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीररित्या जखमी झाले. मृतकांमध्ये दोन पुरुष, तीन महिला व एका २ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जखमींमध्ये चालकासह पाच महिलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातील भोयर व पाटील कुटुंबातील सदस्यांचा मृतकांमध्ये समावेश असल्याचे समजते. चार मृतदेहासह सहा गंभीर जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविले तर दोन मृतदेह वृत्तलिहेस्तोवर वाहनातच फसून होते. यावरून घटनेची भीषणता लक्षात येते. या अपघातातील मृतक व जखमींची नावे मात्र कळू शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार, बाबूपेठ येथील भोयर व पाटील कुटुंबीय देवदर्शानासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे स्कार्पिओ क्रमांक एमएच ३४ एबी ९७८६ ने गेले होते. रात्री उशिरा ही मंडळी या वाहनाने मूल मार्गे बाबूपेठ येथे परतत असताना चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट ते नागाळा दरम्यान एमएच ३४ एपी २५३३ हा ट्रक केसलाघाट ते नागाळा दरम्यान नादुरुस्त अवस्थेत उभा होता. भरधाव येत असलेल्या स्कार्पिओ चालकाला हा ट्रक दिसलाच नाही. अशातच काहीही कळायच्या आता स्कार्पिओ नादुरुस्त ट्रकवर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेची घटनेची वार्ता कानावर येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून जखमींना वाचविण्यासाठी धडपड केली. काहीच वेळाच मूल पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींसह मृतकांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. रात्री १२ वाजून १० मिनिटांपर्यत ते पोहचलेले नव्हते. अधिक तपास मूल पोलीस करीत आहेत.