लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत.सिंदेवाही शहरापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या किन्ही या गावात सायंकाळी उशिरा शेतावरून घरी परतत असलेल्या मुकंदा गोविंद भेंडारे (५२) रा. किन्ही यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वीही निता निकोडे आणि गिता पेंदाम या महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.भेंडारे हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. गोंड, क्षेत्र सहाय्यक अधिकारी आर.एस. लगडे यांनी पंचनामा करून त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित २५ हजार रुपयांची मदत केली. दरम्यान, गुरुवारी वनविभागाच्या वतीने किन्ही परिसरात सर्च मोहीम राबविण्यात येत आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाघाचा शोध सुरू असल्याची माहिती ब्रह्मपुरीचे सहाय्यक वनरक्षक वाकडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. तालुक्यात वारंवार पट्टेदार वाघाचे हल्ले वाढत असल्याने किन्ही-मुरमाडी परिसरातील नागरिक भयभीत आहे. शेतकऱ्यांनी शेतावर जाणे बंद केले आहे.सिंदेवाही तालुक्याला लागूनच बफर झोन असल्याने या परिसरात रोज पट्टेदार वाघांचा संचार सुरू आहे. कित्येक पाळीव जनावरांवरही वाघाने हल्ले केले आहेत. पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी गावाकडे येत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून जंगलात पाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
वनविभागाची चंद्रपूर जिल्ह्यात वाघासाठी सर्च मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:40 PM
किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत.
ठळक मुद्देआतापर्र्यंत तिघांचा बळी सिंदेवाही तालुका वाघाच्या दहशतीत