दुर्गापूर : वेकोलि वसाहतीतील बँक ऑफ इंडियाची खिडकी तोडून बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या घटनेने बँक व्यवस्थापन हादरले आहे.
गत एक महिन्यापूर्वी येथील एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आता चोरट्यांनी चक्क बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. प्रथम त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. लगतच कॅशरूम होती. मात्र ते यात शिरू शकले नाही. त्यामुळे येथील मोठ्या चोरीचा प्रयत्न टळला. याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
सलग दुसऱ्यांदा बँकेत झालेल्या चोरीच्या प्रयत्नाने बँक व्यवस्थापन हादरले आहे. आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिवसभर बँक बंद ठेवण्यात आली होती. दुर्गापूर पोलीस बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चित्रीकरण तपासून चोरट्यांचा शोध घेत आहे.
बँकेत सुरक्षारक्षक नसल्याने हा प्रकार घडला. दुर्गापूर परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याने एकानंतर एक घरफोडीच्या घटना घडत आहेत.