सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
बल्लारपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरात दुसरे आरटीपीसीआर चाचणी केंद्र नागरिकांच्या सेवेत रूजू झाले आहे.
बुधवारी या आरटीपीसीआर चाचणी केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष हरिश शर्मा यांच्या उपस्थितीत झाले. १७ एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला असता डॉक्टरांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दुसरे आरटीपीसीआर चाचणी केंद्र उघडण्यात यावे, अशी मागणी केली होती. आ. मुनगंटीवार यांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या तीनच दिवसात आ. मुनगंटीवार यांनी पूर्तता करत नागरिकांना दिलासा दिला आहे.
बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील काजी बहुउद्देशिय सभाग़ृहात हे आरटीपीसीआर चाचणी केंद्र तयार करण्यात आले असून, या माध्यमातून आता नागरिकांना सदर चाचणीसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून २४ तासांच्या आत शासनमान्य लॅबच्या माध्यमातून अहवाल उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बल्लारपूर शहरात कोविड केअर सेंटरसुध्दा लवकरच उपलब्ध होईल. यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्नशील असून, याबाबतच्या प्रस्तावावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
उद्घाटनप्रसंगी काशिसिंह, नीलेश खरबडे, मनीष पांडे, अजय दुबे, बुचया कंदीवार, सतीश कनकम, स्वामी रायबरम, रोहित गुप्ता आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.