चंद्रपूर : जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची प्राथमिक मोहीम चंद्रपूर प्रशासनाने हाती घेतली. एकूण १७२ हून अधिक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. मात्र, आता दुसऱ्या डोससाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून दुसरा डोस देण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील काही नागरिकांना पहिला डोस घेऊन ४८ हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्याप दुसरी लस मिळाली नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्रांवर दुसरी लस तत्काळ उपलब्ध करण्यात यावी तथा नागरिकांमध्ये दुसऱ्या लसीबाबत असलेला संभ्रम दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.