एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे त्यांची नोंद असणे गरजेचे असते. संबंधित ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अधे-मध्ये त्या वृद्धांची विचारपूस करून त्यांना सहकार्य करावे, असे वरिष्ठांचे निर्देश आहेत. या योजनेतून वृद्ध संबंधित नोंद असलेल्या ठाण्यातून मदत मागू शकतो. परंतु, पोलीस विभाग शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून सरसकट यादी घेऊन नोंद करीत असतात. त्यामुळे संघाचे जे सदस्य असतात, केवळ त्याचीच नोंद होते. इतर ज्येष्ठांची नोंद होत नाही. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठांना तर अशाप्रकारची नोंद केली जात असल्याची माहितीच नसते. कोरोना काळात अशा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
बॉक्स
औषधी आणण्याचीही सोय नाही
शहरात एकाकी जीवन जगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वय झाल्याने तसेच कोरोनाची दहशत असल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना औषधी आणण्यासाठी मोठी पंचायत पडते. कोरोना काळात तर या वृद्धांचे मोठे हाल झाले. परंतु, कोणताही पोलीस कर्मचारी त्यांची साधी विचारपूस करण्यासाठी गेला नाही.
--------
बॉक्स
दोन-तीन महिन्यांतून एकदा मीटिंग
पोलीस विभाग ज्येष्ठ नागरिक संघांकडून यादी मागवितात. त्यानंतर ज्येष्ठांची संपूर्ण माहिती, फोन नंबरसह घेऊन त्याची नोंद करीत असतात. दोन-तीन महिन्यांतून एकदा मीटिंग घेतली जाते. यावेळी ज्येष्ठांच्या समस्येविषयी चर्चा केली जाते.
- विजय चंदावार, विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर
-------
ज्येष्ठांकडून पोलिसांना प्रतिसाद नाही
वयोमानानुसार ज्येष्ठांची स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे ज्येष्ठ कुठे भटकल्यास किंवा विसरल्यास त्यांना सुरक्षित घरी सोडता यावे, यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवून ज्येष्ठांची माहिती घेत त्यांना आयकार्ड वितरित केले. मात्र, कोरोनाच्या दहशतीने अनेकांनी माहिती देण्याची टाळाटाळ केली असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.
-----
कोट
जिल्हा स्तरावर ज्येष्ठ नागरिक समितीची स्थापना केली आहे. याअंतर्गत ज्येष्ठांची नोंद घेतली जाते. त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या जातात. तसेच त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ज्येष्ठांनी कधी वेळी-अवेळी पोलिसांना मदत मागितल्यास त्यांना मदत केली जाते. अनेक ज्येष्ठांना आयकार्डचेसुद्धा वितरण करण्यात आले आहे.
अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
--------