फोटो
हजारो नागरिकांना त्यांनी केले सिडबॉलचे वाटप
भोजराज गोवर्धन
मूल : वृक्षांचे महत्त्व काय असते, हे साधुसंतांनी आधीच सांगितले आहे. परंतु सध्याची पिढी वृक्षसंवर्धनाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. मात्र मूल येथील नवभारत विद्यालयातील सहायक शिक्षिका वर्षा भांडारकर यांनी जांभूळ आणि कडुनिंबाचे सिडबाॅल घरीच तयार केले. जांभूळ आणि कडुलिंबाचे वृक्ष लावण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांना सिडबाॅलचे विनामूल्य वाटपही केले. ज्यांना वृक्षलागवडीची तळमळ आहे, त्यांना त्या वाटप करण्यासाठी घरीच सिडबाॅल तयार करून ठेवले आहेत. त्यांचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. प्राणवायूची देशात कमतरता आहे, प्राणवायुअभावी अनेकांचे जीव गेले आहेत, यावरून वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखणे किती गरजेचे आहे, हे कोरोनाच्या माहामारीवरून लक्षात येते. मात्र आजची युवा पिढी अजूनही वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेताना दिसत नाही. राज्याचे माजी वनमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात सुमारे ३३ कोटी वृक्षलागवडीची क्रांती घडवून आणली. मात्र मागील वर्षभरापासून वृक्षलागवडीचे कार्यक्रम पाहिजे त्या प्रमाणावर होत नसल्याचे दिसून येते. मूल येथील पर्यावरणवादी वर्षा भांडारकर हे मात्र मागील चार वर्षांपासून वृक्षलागवडीचे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्या कोणाकडूनही आर्थिक साहाय्य न घेता स्वखर्चातून त्यांनी हजारो वृक्ष नागरिकांना वाटप केले. पर्यावरणाबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना वनविभागाकडून पाचारण केले जाते.
बॉक्स
घरी आणलेल्या फळांच्या बियांचे जतन
उन्हाळ्यात अनेक प्रजातीचे फळविक्रीसाठी बाजारात आणले जाते. भांडारकर या घरी आणलेल्या फळांच्या बिया कधीही वाया जाऊ देत नाहीत. आंब्याच्या बिया त्या उन्हात ठेवून सुकायला घालतात. सुकल्यानंतर त्या बियांचे सिडबाॅल बनवितात. त्यांनी अनेक प्रजातीच्या फळ आणि वृक्षांच्या बियांचे सिडबाॅल बनवून ठेवलेले आहे. काही सिडबाॅल वाटपही केले आहे, त्या बाहेर फिरायला गेल्या तरीही प्रत्येक पाऊल टाकताना कोणत्याही फळाची बी मिळाली तर त्या घरी घेऊन येतात.
बॉक्स
पर्यावरण वाचविण्यास हातभार : वर्षा भांडारकर
निसर्गात फिरत असताना बीज संकलनातून पर्यावरण संरक्षणाचासुध्दा धडा मिळाला. घरी आणलेल्या फळांच्या बिया आपण टाकून देतो. पण त्याच बियांपासून घरी रोपे तयार करू शकतो किंवा त्यांचे सिडबाॅल करून निसर्गात टाकल्यास नक्कीच पर्यावरण वाचविण्यास हातभार लागू शकतो, असे मत पर्यावरणवादी महिला वर्षा भांडारकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
बॉक्स
सिडबाॅल बनविण्याची पध्दत
सिडबाॅल बनविण्यासाठी शेणखत, रेती, माती, पाण्यात चांगले मिसळवून त्यांचे गोळे तयार करावेत. त्यानंतर त्यात बी भरावी. यासाठी खूप कसरत करण्याची गरज नाही.