वरोरा : खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात. त्यामुळे पेरणी हंगामाच्या पूर्वीच शेतकर्यांनी आपल्या शेतातून निघालेल्या धान्यातून बियाणे तयार करून ठेवले आहे. खरीप व रबी हंगामातील बियाणे पेरण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी शहरातील कृषी केंद्राकडे धाव घेत असतात. ज्या बियाणांना शेतकर्यांची मागणी अधिक असते. अशा बियाणांची बाजारात टंचाई निर्माण झालेली दिसते. अनेकदा निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे शेतकर्यांना विकत घ्यावे लागते. बियाणे मिळण्यास विलंब झाला किंवा बियाणांची उगवण क्षमता शून्य असल्यास शेतकर्यांची शेती पडून राहते. याबाबत बिलासह कृषी विभागाकडे तक्रारी केल्यास बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसान भरपाई अल्प असते. तोपर्यंत हंगाम निघून गेलेला असतो. यावर मात करण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी सरसावले आहेत. शेतातील पीक निघाल्याबरोबर ते चांगल्या उन्हामध्ये चार ते पाच दिवस ठेवतात. त्यातील माती कचरा व काही टोचलेले दाणे वेगळे काढून चांगल्या प्रकारचे दाने लोखंडी डब्ब्यामध्ये घरात भरून ठेवतात. लोखंडी डब्ब्याच्या तोंडावर शेण लावले जाते. बियाणे ठेवलेल्या डब्याला पाण्यापासून अलिप्त ठेवले जाते. शेती तयार झाल्यानंतर घरीच तयार केलेले बियाणे पेरणीसाठी वापरत असतात. (तालुका प्रतिनिधी)
शेतकर्यांनी स्वत:च तयार केले बियाणे
By admin | Published: June 03, 2014 11:58 PM