लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत संचालित चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा आरोप करून ३० विद्यार्थी चक्क आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी रात्री धडकले. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरत सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ सामाजिक न्याय विभागाद्वारा शासकीय वसतिगृह संचालित केले जाते. मंगळवारी रात्रीचे भोजन निकृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या गृहपालांकडे केली. परंतु त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. दरम्यान, संतप्त विद्यार्थी रात्री १०:३० वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी धडकले. तेव्हा आमदार जोरगेवार हे निवासस्थानी नव्हते. तोपर्यंत विद्यार्थी तिथेच थांबले होते. ग्रामीण भागाचा दौरा आटोपून रात्री निवासस्थानी पोहोचताच विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. विद्यार्थी उपाशी असल्याचे लक्षात येताच आमदार जोरगेवार यांनी सर्वांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. वसतिगृहाच्या गृहपालांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून धारेवर धरले व विद्यार्थ्यांना नियमानुसार, उत्तम दर्जाचे भोजन देण्याचे निर्देश दिले. भोजन केल्यानंतर हे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात परत गेले.
असा आहे विद्यार्थ्यांचा आरोपवसतिगृहातील रात्रीच्या जेवणात अळ्या निघाल्याने आम्ही उपाशी होतो. आमच्यातील एकाने तक्रार करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे जाण्याचे सुचविले. आम्ही रात्रीच पत्ता शोधत त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो, मात्र ते घरी नसल्याने तेथेच वाट पाहत बसलो. ते आल्यावर घडलेला प्रकार सांगून कारवाईची मागणी केली. त्यांनी कारवाई करूच; पण प्रथम तुम्ही जेवण करून घ्या,' असे म्हणत आपल्या स्वीय सहायकांना सांगून जेवणाची सोय करून दिली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे
"शासकीय वसतिगृहातील भोजन दर्जेदारच असते. भोजनाची वेळ टळून गेल्यानंतर काही विद्यार्थी उशिरा रात्री वसतिगृहात दाखल झाले. त्यावेळी स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची सुट्टी झाली होती. विद्यार्थ्यांना समज देऊन भोजनाच्या व्यवस्थेची तयारीही करता आली असती. विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन वेगळा मार्ग निवडला. आता सर्व विद्यार्थी वसतिगृहात आले असून, सर्व सुरळीत आहे. याबाबत गृहपाल व संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. "- बाबासाहेब देशमुख, आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, चंद्रपूर