चार चाकी गाडीसह 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त ; तळोधी पोलिसांची कार्यवाही
सावरगाव : नागभीड तालुक्यातील अप्पर पोलीस स्टेशन तळोधी (बा.) अंतर्गत पोलीस स्टेशनसमोर केलेल्या नाकेबंदीत देशी दारूने भरलेले चारचाकी वाहन पोलिसांनी पकडले असून, आरोपी ओमकार सिंह नानक सिंग टाक (रा. राजुली, ता. मूल) याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली.
मंगळवारी खबरीच्या सूचनेवरून तळोधी येथील पोलीस स्टेशनसमोरच नागपूर-नागभीड -चंद्रपूर महामार्गांवर पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीत एका चारचाकी वाहनाची पंचांसमक्ष (सेन्ट्रा गाडी (क्र. एमएच ३४ के २०१३) झडती घेतली असता, त्यामध्ये देशी दारू आढळून आली. त्याची किंमत ६० हजार रुपये एवढी असून, अवैध दारूसाठी वापरण्यात आलेल्या जुन्या चारचाकी गाडीची किंमत दोन लाख एवढी आहे. दरम्यान, अशा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी ओमकार सिंह नानक सिंह टाक याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तळोधी पोलिसांनी दिली.