दोन महिला सरपंच कॉंग्रेसमध्ये : राजुरा येथे कॉंग्रेसचा मेळावाराजुरा : कोरपना तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वनसडी आणि गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दोन्ही महिला सरपंचानी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. याप्रसंगी शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आगामी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पसंती देण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.राजुरा विधानसभा कॉँग्रेस व युवक कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी स्थानिक ज्योतिबा फुले शाळेच्या पटांगणावर भव्य शेतकरी, शेतमजुर, मजुर, महिला व युवक मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक होते. तर विशेष अतिथी म्हणून विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रमुख अतिथी विधिमंडळाचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हा निरीक्षक एस. क्यू. जमा, अनंतराव घारड, नाना गावंडे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, बाबुराव तिडके, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. नामदेव उसेंडी, प्रकाश मारकवार, प्रमोद तितरमारे, युवक कॉँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शिवा राव, महिला कॉंग्रेस अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, आसावरी देवतळे व जिल्यातील अनेक नेते उपस्थित होते.प्रस्ताविकातून माजी आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. धोटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या काळात सुरु झालेल्या राजुरा-बल्लारपूर उड्डाण पुलाचे काम बंद झाले असून भाजपा सरकार दुर्लक्ष करीत आहे. वनहक्क कायद्यामुळे जिवती तालुक्यातील हजारो कुटुंब बेघर होणार असून तालुक्यातील जनता दहशतीत आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या वाळलेल्या शेंगा फुटून नव्याने अंकुर उगवले आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. कापूस पिकाला भाव नाही. विधानसभा क्षेत्रातील एकही रस्ता बरोबर नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी विधिमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांवर कडाडून टीका केली. मेळाव्यातील गर्दी पाहून ‘कुठे गेले अच्छे दिन’ म्हणत लोकांना प्रश्न विचारून आतातरी खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे त्यांनी आवाहन केले. माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या कार्याची प्रशंसा केली. सुभाष धोटे आमदार असताना राजुरा विधानसभा क्षेत्राचा ज्या पद्धतीने विकास झाला, आता विकास पूर्णत: थांबला असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच जनसामान्याला तारणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन युवक कॉंग्रेसचे महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. आभार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. मेळाव्याला राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)विकासकामांचे श्रेय सुभाष धोटेंना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, सुभाष धोटे आमदार असताना मी मुख्यमंत्री होतो. राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसाठी सुभाष धोटे तळमळीने झटत होते. त्यांच्या हातात नेहमी पाठपुरावा करण्यासाठी १५-२० पत्र असायचे. गत निवडणुकीत अशा लढवय्या नेत्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात ५०० कोटींची कामे केल्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचे श्रेय सुभाष धोटे यांनाच जात असल्याचे ते म्हणाले.
पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काँग्रेसला निवडा - चव्हाण
By admin | Published: October 10, 2016 12:39 AM