एनएसयुआयची मागणी : प्रस्तावित जागा गैरसोयीचीचंद्रपूर : चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या प्रयत्नाने व न्यायपालिकेच्या न्यायोचीत निर्णयाने सुरू झाले आहे. या महाविद्यालयाला १ वर्ष पूर्ण होऊन दुसरे वर्ष सुरू झाले आहे. कॉलेजची प्रस्तावित इमारत होईपर्यंत रामनगर येथील पूर्वीच्या टी.बी. हॉस्पीटलच्या परिसरात भरविण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी पर्यावरण पूरक व प्रशस्थ अशा योग्य जागेची निवड करण्याची मागणी एनएसयुआयचे प्रांतिय अध्यक्ष रोशनलाल बिट्टू, जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी यांनी केली आहे.या कॉलेजच्या बांधकामासाठी बायपास रोडच्या पूर्व दिशेला एक ते दीड किलोमिटर आत पागलबाबा नगर जवळची जागा प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित जागेसंबंधी महाविद्यालयाचे डीन डॉ. मोरे यांचे लक्ष वेधले आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयासाठी प्रस्तावित जागा मेडीकल कॉलेजच्या सर्व दृष्टीने गैरसोईची व अयोग्य आहे. या जागेला लागून चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे डम्पींगयार्ड असून लागूनच महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट व फेरोमॅग्नीज कारखाना आहे. हा कारखाना सतत दुषीत धूर ओकत असतो व डम्पिंगयार्डमध्ये सडणाऱ्या कचऱ्याची तसेच मेलेल्या सडलेल्या जनावरांची दुर्गंध हवेत सतत मिसळत असते. त्यामुळे निकोप पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून ही जागा अयोग्य आहे. त्याचप्रमाणे या जागेला लागूनच जुनोना जंगल आहे. त्यामुळे जंगलातील हिस्त्रप्राणी व इतर जंगली जनावरे यांच्या बायपास रोडपर्यंत वावर असतो. त्यामुळे रात्री बेरात्री महिला व पुरुषांना त्रास होतो. ही जागा उंच सरळ, पठारासारखी असल्यामुळे तिचे सपाटीकरण करून बांधकामास योग्य करण्यासाठी अंदाजे ६० कोटी अनाठाई खर्च शासनाचा होणार आहे. तसेच रेल्वे स्टेशन व बस स्टँड यापासून ही जागा ३ किलोमिटर अंतरापेक्षा जास्त अंतरावर आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रस्तावित जागेवर होणारे मेडिकल कॉलेज व त्यामध्ये असणारे विद्यार्थ्यांचे होस्टेल तसेच अधिकाऱ्यांची निवासस्थाने ही आरोग्यदृष्ट्या घातक ठरणार आहेत, असे म्हटले आहे. याकरिता प्रस्तावित शासकीय वैद्यकीय मेडीकल कॉलेजसाठी योग्य जागा ही नविन चंद्रपूर परिसरात शोधून जी ७० एकर जागा शासकीय इमारतीच्या प्रयोजनासाठी राखून ठेवली आहे. त्यापैकी ३० एकर जागा मेडीकल कॉलेजला मिळाली तर सर्व दृष्टीने सोईची होईल. बोटनिकल गार्डनसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेपैकी ३० एकर जागा शासकीय मेडीकल कॉलेजसाठी दिल्यास ती जागा सुद्धा सोईची होईल. तरी आपण शासकीय मेडीकल कॉलेजच्या दृष्टीने योग्य अशी पर्यायी जागा निवडण्यासंबंधी कार्यवाही करण्याची मागणी एनएसयुआयने केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोयीची जागा निवडावी
By admin | Published: August 01, 2016 12:38 AM