निवड समिती विश्वासार्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:42 AM2019-08-01T00:42:34+5:302019-08-01T00:43:13+5:30
काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच्छुकांची मुलाखती घेण्याचा फार्स करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच्छुकांची मुलाखती घेण्याचा फार्स करीत आहेत. काँग्रेसची विधानसभा इच्छुक उमेदवाराची निवड समिती विश्वासहार्य नसल्याचा आरोप माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सोमवारी केला.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार येथील इंटक भवन, बायपास रोड येथील कार्यालयात आज चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, चिमूर, वरोरा व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या पार्श्वभूमीवर माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या समर्थक उमेदवारांनी याकडे पाठ फिरवून निष्ठावान कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा राजीव गांधी सभागृहात घेतला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
नरेश पुगलिया म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता कॉंग्रेसची उर्जा आहे. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना निष्ठावंताना न्याय मिळाला पाहिजे. जिल्हा निवड समितीत असणारे ९० टक्के सदस्य स्वत:च्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून त्यावर इतरांनी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महासचिव मल्लीकार्जुन खरगे यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट देवून बाजू मांडणार असल्याचे पुगलिया म्हणाले.
यावेळी कॉंग्रेसचे नेते गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, मनपाचे गटनेता डॉ. सुरेश महाकूलकर, जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, शिवचंद काळे, अॅड. अविनाश ठावरी, देवेंद्र बेले, अविनाश जाधव, प्रविण पडवेकर, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव, माजी जि. प. सदस्य रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, चंद्रशेखर पोडे, चेतन गेडाम, करण पुगलिया यांच्यासह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
इंटकचा जिल्हा निवड समितीवर आक्षेप
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल टेंÑड युनियन कॉंग्रेसने जिल्हा निवड समितीवर आक्षेप घेवून मुलाखतीचा फार्स असल्याचे पत्र परिषदेतून सांगिंतले. कॉंग्रेस पक्षाने राज्यात कॉंग्रेसला बलवान करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष यांच्यासह विभागीय समतोल साधण्यासाठी पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली. मात्र जिल्हास्तरावरील निवड समिती केवळ देखावा असल्याचा आरोप यावेळी कामगार नेते चंद्रशेखर पोडे, वसंत मांढरे, रामभाउ टोंगे, रामदास वाग्दरकर, मानवटकर, शोभा महतो, छबु मेश्राम, सुमन गौरकार यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केला. धनशक्तीला वगळून जनशक्ती असणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.