बल्लारपूर (चंद्रपूर) : निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्यप्रदेशातील उज्जैन येथे चक्क ५० हजारांत विक्री केल्याने खळबळ उडाली आहे. राजुरा येथील एका महिलेने दलालाच्या मध्यस्थीने या महिलेचा सौदा केल्याचे उघडकीस येताच बल्लारपूर पोलिसांनीउज्जैन येथून दोन महिलांसह एका इसमाला अटक केली. पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. उज्जैन येथील मदन अंबाराम राठी, आशा रामटेके ऊर्फ माधुरी वाघमारे आणि स्वप्ना पेंदोर (२३) रा. राजुरा अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. ती बल्लारपूर येथील नातेवाईकांकडे राहण्यास आली असता राजुरा येथील येथील रहिवासी आशा रामटेके ऊर्फ माधुरी वाघमारे हिची पीडितेशी ओळख झाली. दरम्यान, आरोपी महिलेने तिला नागपुरात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. नोकरीसाठी नागपूर येथे न नेता तिला उज्जैन येथे नेले. तेथे मदन अंबाराम राठी या इसमाकडून ५० हजार रुपये घेऊन पीडितेसोबत विवाह लावून दिला. राठी याने पीडित महिलेला खोलीत कोंडून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात येताच तिने संधी साधून राजुरा येथील मावशीला फोनवरून सर्व प्रकार सांगितला. त्यांनतर पीडितेचा भाऊ आकाश मनोहर पाझरे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलांनी व चमूसह उज्जैन येथे जाऊन तिघांना अटक केली. बल्लारपूर न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आणखी काही दलालांचा शोध सुरू
या प्रकरणात आणखी काही दलालांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बल्लारपूर पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. पीडितेने सांगितलेली माहिती व स्थळांची खात्री करून तपास केला जात आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन आणि बल्लारपूर व राजुरा असा संबंध कसा प्रस्थापित झाला ? यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे ? यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.