नोटाबंदीचा परिणाम : धान उत्पादक शेतकरी चिंतेतपोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान मळणी करुन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे कवडीमोल भावात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांमध्ये धानाची विक्री करीत आहे. नोटबंदीच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची व्यापाराकडून लुट केली जात आहे. भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक आमिष दाखविले होते. मात्र कष्ट करुन पिकविलेल्या शेतमालाची कवडीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे भाजपा सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल मागास असलेला व उद्योग विरहित असलेला तालुका आहे. या ठिकाणी केवळ धानाचे उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांचे धान उत्पादन झाले असून कुटुंबातील आर्थिक चणचण भागविण्याकरिता नोटाबंदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कवडीमोल म्हणजेच १७०० ते १८०० रुपयाने धानाची खरेदी करुन परिसरातील शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. मात्र स्थानिक परिसरातील लोकप्रतिनिधी हे चित्र उघड्या डोळ्यांनी पाहून येणाऱ्या आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत व्यस्त असल्याचे वास्तव या परिसरामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी २५०० ते ३००० रुपयांपर्यंत धानाचे दर वाढले होते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण योग्य झाल्याने धानपिकाला पोषक वातावरण मिळाल्याने गत पाच वर्षाच्यो तुलनेत उत्पादनात काही प्रमाणात भर पडली आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी पूर्णत: खचला जात आहे.मात्र परिसरातील लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या व्युहरचनेत गुंतले असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे, शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हटल्या जाते. मात्र आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्याचे वास्तव्य बघितले तर जगाचा पोशींदा खरोखरच सुखी आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांसारखा कर्जबाजारी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलीत जन्मतो व कर्जाच्या दलदलीत मरतो, हे वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दरवर्षी बि-बियानाचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशक औषधांचे भाव गगणाला भिडले असते. उत्पादनात सातत्याने होणारी घट व नापिकीही याला कारणीभूत आहे. कधी उभ्या पिकामध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगांचे आक्रमण या सर्व प्रकारच्या काळचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतामध्ये दिवसरात्र राबतो. पण त्याच्या नशिबी सुखी दिवस कधीच येताना दिसत नाही. उलट दु:खाचे व कष्टाचे दिवसच त्याला काढावे लागते. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे आहे. निसर्गावर मात करुन शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन घेतले आहे, त्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य तो भाव मिळत नाही. व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. विपणन व्यवस्था व पैशाची गरज असल्याने कवडीमोल दराने धान पिकावे लागत आहे. भाव मिळेपर्यंत गरीब शेतकऱ्याकडे धान्य साठवणूक करुन ठेवण्याची व्यवस्था नसते. उत्पादन हाती येताच वर्षभराचे बजेट ठरवावे लागते. उसनवारीने घेतलेले कर्ज फेडावे लागते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्याचे सातत्याने शोषण होत आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे काळाची गरज आहे.(वार्ताहर)
धानाची कवडीमोल भावात विक्री
By admin | Published: January 10, 2017 12:45 AM