लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आॅपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेत दाखल झालेल्या सैनिकी पेहरावातील पहिल्या तुकडीला संबोधित करताना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यामध्ये या शाळेचा विद्यार्थी आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा व त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे उदघाटन लवकरच प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र सैनिकी शाळेच्या नियमानुसार या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून ९० विद्यार्थ्यांची सहाव्या वर्गाची पहिली तुकडी अभ्यासक्रमाला लागली आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या शुभ पर्वावर चंद्रपूर सैनिकी शाळेने देशभक्तीने ओतप्रोत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सैनिकी शाळेसाठी प्रेरणास्थान ठरलेले सर्जिकल स्ट्राइकमधील मुख्य भूमिका असलेले लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ज्यांनी अथक पाठपुरावा व विक्रमी वेळेत १२३ एकरामधील सैनिकी शाळा चंद्रपूरकरांना लोकार्पित केली, असे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला सीनियर अॅडमिन एअर स्टाफ आॅफिसर बी. मणिकंटन, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजली घोटेकर, विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बल्लारपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांचीदेखील उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिकी शाळेच्या निर्मितीमागील भूमिका व प्रेरणा विषद केली. देशातील ७१२ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा चंद्रपूर आहे. त्यामुळे या सैनिकी शाळेतून निघालेला एक एक विद्यार्थी या देशाचा नावलौकिक वाढविणारा विद्यार्थी असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ही सैनिकी शाळा विक्रमी १४ महिन्यात तयार झाली आहे. या कार्यक्रमाला मोठया संख्येने सैनिकी शाळेच्या निमार्णाचे काम करणारे कामगारदेखील उपस्थित होते.पालकमंत्र्यांना दिला गार्ड आॅफ आॅनरआज कारगिल दिनी या सैनिकी शाळेमध्ये दिल्लीच्या इंडिया गेटप्रमाणे तयार करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर अवघ्या बारा, तेरा वर्षांचे असणारे सैनिकी पेहरावातील विद्यार्थ्यांनी सैनिकी शिस्तीत पालकमंत्र्यांना गार्ड आॅफ आॅनर दिला. उपस्थित सर्व ९० विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सलामी दिली. हा क्षण पालकमंत्र्यांना भावूक करणारा ठरला. त्यानंतरचा सैनिकी शाळेतील विस्तीर्ण मैदानावरचा कार्यक्रम सैनिकी शिस्तीचा वेगळा आविष्कार होता. सैनिकी शाळेचे गीत, एअर फोर्स दलाच्या बँडचे संचालन व शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.४ आॅगस्टला आमीर खान चंद्रपुरात४ आॅगस्ट रोजी चंद्रपूरला आमीर खान यांच्याहस्ते मिशन शक्तीला सुरुवात होत असून येत्या आॅलम्पिकमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीतील क्रीडापटूंनी आॅलम्पिकमध्ये मेडल मिळावे, ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
सेनेचे वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर शाळेचे असावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:39 AM
आॅपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. उदघाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर सैनिकी शाळेत कारगिल दिवस