लोकमत न्युज नेटवर्क
मासळ (बु) : चिमूर तालुक्यातील मासळ ( बु ) वरून तीन किलोमीटर अंतरावरील मानेमोहाळी येथे मागील २५ वर्षांपासून गावातील ज्येष्ठ नागरिकांना १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनामित्त ध्वजारोहण करण्याचा मान दिल्या जात आहे. यावर्षी स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्याचा मान गावातीलच ज्येष्ठ नागरिक माणिकराव खोब्रागडे यांना दिल्या गेला आहे.
मानेमोहाळी साधारणतः दीड हजार लोकवस्तीचे गाव आहे. अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविद्याने सर्व सण, उत्सव एकत्रितपणे राबवितात. गावात जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी गावातील मुले मासळ किंवा तालुक्याच्या ठिकाणी जातात. याच गावचे उच्यशिक्षित व्यक्ती विद्यमान सरपंच प्रा. राजेंद्र कराळे हे चारवेळा गावचे सरपंच तर एकदा पंचायत समिती सदस्य होते. त्यांनी सन २०००ला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावासाठी तालुकास्तरावरील बक्षीस सुद्धा मिळविले. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तेव्हापासून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्याचा मान ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जात आहे. ही परंपरा मागील २५ वर्षांपासून अखंडित आहे.
140821\1425-img-20210814-wa0018.jpg
मानेमोहाळी ग्रामपंचायत फोटो