चंद्रपूर : मागील दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे प्रत्येक जण अडचणीत आले आहे. बाहेर फिरण्यावरही निर्बंध होते. अशावेळी लहान बालकांसह, ज्येष्ठांना घरातच राहावे लागते. अनेक दिवसांपासून घरात राहून कंटाळलेल्या ज्येष्ठांच्या विरंगुळा व्हावा, त्यांना मोकळा श्वास घेता यावा तसेच मनातील विचार-आचार आदान-प्रधान व्हावे या उद्देशाने येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, निर्माण नगर, तुकुमने ज्येष्ठांची सहल काढत त्यांना देवदर्शन तसेच निसर्गरम्य ठिकाणी फिरवून आणण्यात आले. यामुळे मागील दीड वर्षांपासून आलेला कंटाळा दूर झाला असून ज्येष्ठांनी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, निर्माण नगरने नुकतीच ज्येष्ठांची चिचपल्ली मारुती दर्शन, अजयपूर झोपलेला मारुती दर्शन, सोमनाथ मंदिर महादेवाचे दर्शन, धबधबा मनमोहक दृश्य या ठिकाणासह मार्कंडेय देव गडचिरोली येथेही नेण्यात आले.
जाताना ज्येष्ठांनी भजन, चित्रपट गाणे, महादेवाचे गाणे, अंताक्षरी आदी म्हणत विरंगुळा केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्राचार्य मेघा मावळे, शिक्षिका नंदा बिहाडे, नंदा येरपुरे, वृषाली धर्मपुरीवार, उज्ज्वला कडकभाजने, लता ढोके, अशोक बिहाडे, सोनाली नंदगिरवार, शालिनी कोहळे, बनसोड, अनिल धर्मपुरीवार, रमेश ददगाल आदींनी सहभाग घेतला.
सहलीसाठी संघाचे सचिव भोलारम सोनुले, कार्याध्यक्ष रमेश ददगाल, सल्लागार दिवाकर राऊतकर, सल्लागार पधरे, कोषाध्यक्ष श्याम वाढई, सदस्य बंडू वाढई, गणेश बनसोड या सर्वांनी सहकार्य केले. संघाचे अध्यक्ष बबनराव धर्मपुरीवार यांनी आभार मानले.