चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वाढलेले प्रदूषण, पर्यावरण समतोल यामुळे वातावरणात बदल होत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून महेश नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने वाजत-गाचत वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
महेश नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने प्रस्तावित विरंगुळा केंद्राच्या प्रांगणामध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. तत्पूर्वी जनजागृतीसाठी वृक्षपालखी काढण्यात आली. पालखीचे पूजन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले. विविध पर्यावरणविषयक घोषणेसह जनजागृती करण्यात आली. रत्नमाला नरड व ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नेतृत्वात टाळ, भजन दिंडीचेही आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी ज्येष्ठांचा पुढाकार बघून वार्डातील नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेतला. या दिंडीमध्ये शोभा चिडे, कौशल्या वैद्य, ताईबाई पडवे, सुरेखा मदे, शीला पिजदूरकर, स्वरस्वती कुमरे, सुषणा डांगे, लीला गेडेकर, निरंजना पोटे, सुरेखा लडके, संध्या सहस्त्रबुद्धे, होकम, शारदा थेरे, वर्षा देशमुख, देवतळे, राऊत यांच्यासह वार्डातील बालगोपालांनी सहभाग घेतला.
यावेळी विरंगुळा केंद्र परिसरामध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, महेशनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य विश्वनाथ तामगाडगे, गंगाधर पिजदूरकर, शंकरराव गेडेकर, सुरेश तराठे, तुळशीराम नरड, महादेव थेरे, रवी नरड, देव नरज, वामनराव मंदे, जगन्नाथ गुरुनुले, नीलेश थेरे यांच्यासह वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती.