बाळू धानोरकर : भद्रावतीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आढावा बैठक
भद्रावती : भद्रावती व वरोरा शहर तथा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २० छोटे व्हेंटिलेटर (एनआयव्ही), एक ॲम्ब्युलन्स, एक स्वर्गरथ, जैन मंदिर कोविड केंद्रात ३० बेड्स तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती येथील आढावा बैठकीत दिली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी नगर परिषद भद्रावती सभागृहात करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णांचा विचार करता दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून, यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ बेडचे नियोजन करण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. जैन मंदिर कोविड सेंटर येथे रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांवरही पोलिसांनी वचक ठेवावा, अशी माहिती देण्यात आली. यावेळी धानोरकर यांनी या सर्व कामांसाठी एक कोटीचा निधी नगरपालिकेला दिला आहे.
या वेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे, तहसीलदार महेश शितोळे, ठाणेदार सुनील सिंह पवार, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय असुटकर आदी उपस्थित होते.