चंद्रपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षासाठी आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेतलेल्या समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाचे सर्व वसतिगृहाचे निर्जंतुकीकरण करून संबंधित विभागाला हस्तांतर करून शैक्षणिक विकासाचे केंद्र खुले करावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाच्या वतीने समाजकल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाचे सर्व वसतिगृह विलगीकरण कक्षासाठी आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र आता बऱ्याच प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. परिणामी महाराष्ट्र शासनाने इयता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करून शाळा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा शिक्षणासाठी शहरात परतले आहेत. मात्र आरोग्य विभागाने ताब्यात घेतलेले वसतिगृह निर्जंतुकीकरण करून न दिल्याने विद्यार्थ्यांना भाड्याची रूम करून राहावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे वसतिगृहातील सर्व साहित्यांचे निर्जंतुकीकरण करून वसतिगृह संबंधित विभागाकडे
हस्तातरित करावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे आदी उपस्थित होते.