बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील आमडी येथील हरित क्रीडांगण येथे विलगीकरण कक्ष उघडण्यात आले असून यात २० बेडची व्यवस्था आहे.
खेड्यांमध्ये घराच्या जागेच्या अडचणीपायी कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणात बऱ्याच बाधा येतात. ग्रामीण क्षेत्रातील ही बाब लक्षात घेऊन येथील व्यवसायी व गुरुनानक पब्लिक स्कूलचे संचालक कैलास खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन गुरुनानक पब्लिक स्कूलच्या माध्यमातून बल्लारपूर जेसीआय संयुक्त विद्यमाने सरकारी यंत्रणेच्या मार्गदर्शनात हे कोविड विलगीकरण ग्रामीण भागातील सेवार्थ उघडले आहे. याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, तहसीलदार संजय राईनचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन मेश्राम, तहसील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल कोहपरे, डॉ. धाडसे, जेसीयायचे अनुप गांधी, संजय गुप्ता, कैलास खंडेलवाल यांची उपस्थिती होती. तहसीलदार संजय राईनचवार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन करून गुरुनानक पब्लिक स्कूलच्या शिक्षिका सुषमा सोडवले यांनी आभार मानले.