कोरोना काळात मालक व्यस्त असल्याची साधली संधी
भिसी : भिसी- चिमूर मार्गावरील धनराज मुंगले यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपमध्ये कार्यरत दोन नोकरांनी १४ एप्रिल ते ९ मे या कालावधीत टिल्लू पंपच्या मदतीने डिझेल टँकमधून अंदाजे साडेपाच लाख रुपयांच्या डिझेलची चोरी केली. हा गैरप्रकार धनराज मुंगले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी सचिन नामदेव मुंगले व विशाल धनराज गोहणे दोन्ही रा. भिसी यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या डिझेलपैकी ३६ हजार रुपये किमतीचे डिझेल जप्त केले.
१४ एप्रिल ते ९ मे या काळात भिसी व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. शिवाय धनराज मुंगले यांच्या नात्यातील सहा ते आठ व्यक्ती कोरोनाबाधित झाले होते. पेट्रोल पंपावरील अनेक नोकरही बाधित झाले होते. त्यांना उपचारासाठी मदत करण्यात धनराज मुंगले व्यस्त होते. त्यामुळे पेट्रोल पंपवर जाऊन नियमित हिशेब घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. या संधीचा फायदा घेत सचिन मुंगले व विशाल गोहणे यांनी डिझेल चोरी सुरू केली. डिझेल टँकमधील मोटरच्या साहाय्याने रात्री सहा हजार लिटर डिझेलची चोरी करून हे डिझेल अज्ञात ट्रक चालकांना विकले.
या चोरीमध्ये दहा ते बारा व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे. इतर आरोपींचा शोध घेतला जात असून भिसीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम पुढील तपास करीत आहेत.