आवाळपूर : गडचांदूर शहरात असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडअंतर्गत ५० बेडचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी वी कॅन फाऊंडेशन, गडचांदूरतर्फे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरातसुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गडचांदूर हे औद्योगिक शहर असून, येथे दररोज शेतकरी, मजूर, कंपनीत काम करणारे रोजंदार शहरात येत असतात. बाहेरून माल वाहतूक सुरू असते. गडचांदुरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता माणिकगड़ कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून ऑक्सिजनयुक्त ५० बेडची सोय करून कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी वी कॅन फाऊंडेशन, गडचांदूरने मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकड़े निवेदनातून केली आहे.
गडचांदूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेली मोठी बाजारपेठ असून, शहरात दोन तालुक्यातील नागरिकांची ये- जा असते. गडचांदुरात कोविड हॉस्पिटलची नितांत गरज आहे. कंपनीनेही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.