चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या योजनांची माहिती त्यांना नसते. बरेचदा माहिती असूनही त्याचा लाभ कसा घ्यावा, हे कळत नाही. अशावेळी गरजूंच्या पाठिशी उभे राहण्याचे काम सेवा केंद्र करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या निमित्ताने देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कामाचा झंझावात सुरू झाला आहे, असे प्रतिपादनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
भाजपाने माणूसकीच्या धर्माचे पालन केले आहे आणि याच भावनेतून जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जात, पात, धर्माचे बंधन न ठेवता हे सेवा केंद्र जनतेची सेवा करेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. राजुरा येथील मुनगंटीवार सेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याचा गौरव केला. "जो करता है सेवाभाव उसका नाम है देवराव" अशा शब्दात मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याची स्तुती केली. राजुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य व गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
भाजपा राजुरा विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे यांनी याआधीही घुग्गुसला असे सेवा केंद्र सुरू करून तेथील जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. त्याच धर्तीवर राजुरा विधानसभेच्या जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम या सेवा केंद्रातुन होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार यांनी सेवा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. गोरगरिबांची सेवा करण्याचा संकल्प करत सेवाभावी वृत्तीने या सेवा केंद्राचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे. या जिल्ह्यातील जनतेने भाजपावर मनापासून प्रेम केले. जनतेने जे काही दिले ते नम्रपणे स्वीकारायचे असते. आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सेवा असायला हवा, खुर्ची नव्हे. पद गेले तरीही आपल्या कामांची आठवण जनतेला राहील, या उद्देशाने कार्यकर्ता काम करीत आहे. आणि आता हे सेवा केंद्रही त्याच उद्देश्यांनी काम करणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
एखादी व्यक्ती आजारी असते. कुटुंब उपचारासाठी खर्च करताना मानसिक तणावात असते. उपचारानंतरही अनेक वर्षे त्या खर्चाचा ताण जात नाही. मात्र सरकारने आरोग्य योजनांच्या माध्यमातून जनतेची सोय केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत तर ५ लाखांपर्यंतचा खर्च उपचारासाठी दिला जातो आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र या योजनेची माहिती नसेल तर सेवा केंद्र ती उपलब्ध करून देईल. सेवा केंद्र आपल्या पाठिशी उभे राहील, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी दिला. दीड कोटी शेतकऱ्यांनी डिजीटल सुविधेद्वारे एक रुपयांत पिक विमा काढला. मात्र अनेक शेतकरी ऑनलाईन सुविधा वापरू शकत नाहीत. अशांच्या पाठिशी सेवा केंद्र उभे राहिले पाहिजे. माहिती नसल्यामुळे कुणी सुटता कामा नये. सेवाकेंद्राला भेट देणाऱ्या सर्वांचे कामं व्यवस्थित झाले पाहिजे याची पूर्ण काळजी सेवा केंद्राला घ्यायची आहे, अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली.