तपाळ योजनेला फटका : दीड-दोन लाखांची मिरची जळून खाकनागभीड : नागभीड नगरपरिषदेअंतर्गत भिकेश्वर येथे ३३ के.व्ही. विद्युत लाईनचा तार तुटून मिरची सातऱ्यावर पडल्याने दीड ते दोन लाख रुपये किंमतीची मिरची जळून खाक झाली. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या तारेचा फटका येथील तपाळ योजनेलाही बसला असून भिकेश्वर येथील तपाळ योजनेचे विद्युत मीटरही जळाले आहेत.भिकेश्वर येथे मिरची साफ करण्यासाठी सातरा सुरू करण्यात आला आहे. या सातऱ्यावर जवळपास तीनशे मजूर काम करतात. जेथे सातरा लावण्यात आला, त्याच्यावरून ३३ केव्ही विद्युत लाईन गेली आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिरची साफ करण्याचे काम सुरू असताना या लाईनचा तार अचानक तुटला आणि काम सुरू असलेल्या झोपडीवर पडला. काही क्षणातच या झोपडीने पेट घेतला. ही बाब मजुरांच्या लक्षात येताच ते सैरावैरा पळू लागले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.प्रसंगावधान राखून या मजुरांनी मिळेल तेथील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरी पण या आगीत दीड ते दोन लाख रुपये किंमतीची मिरची व झोपड्यांचे साहित्य जळून खाक झाले. घटनेबद्दल पोलिसांना व वीज वितरण कंपनीला कळविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)या तुटलेल्या तारेचा तपाळ योजनेच्या विद्युत लाईनलाही स्पर्श झाला. तुटलेली तार अति उच्च दाबाची असल्याने तपाळ योजनेचे भिकेश्वर येथील विद्युत मीटरही जळून खाक झाले. या प्रकारामुळे नागभीड व नवखळा येथील तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी चार दिवस बंद राहण्याची शक्यता योजनेच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविली. मीटर व वायरिंगचे काम केल्याशिवाय पाणी सुरू होणार नाही.
विद्युत तार पडल्याने मिरची सातरा जळून खाक
By admin | Published: March 27, 2017 12:39 AM