चंद्रपूर : शासनाकडून ग्रामीण जनतेच्या हाताला गाव परिसरातच काम मिळावे, या हेतूने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली. मात्र, सावली तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोखाळा येथील मजुरांना रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मिळालेला नाही. त्यामुळे मजुरांनी रोष व्यक्त केला आहे.ग्रामीण नागरिकांना वर्षभरात शंभर दिवसांचे काम देण्याची हमी रोजगार हमी योजनेद्वारे देण्यात आली आहे. गावागावात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जात आहे. सावली तालुक्यातील मोखाळा येथेही रोहयो योजनेंतर्गत १८ मार्च ते ११ मे पर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्जात आले. कामाचा मोबदला थेट मजुरांच्या बचत खात्यात जमा होण्यासाठी मजुरांनी बँकेत खातेही उघडले. मात्र, अद्यापही मजुरीची रक्कम जमा झालेली नाही.रोहयो योजनेंतर्गत मजुरीच्या खर्चासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. गावापासून पाच किमीपेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्यास दहा टक्के जास्त मजुरी देण्यात येते. तसेच काम उपलब्ध न केल्यास मजुरीच्या २५ टक्के बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. परंतु, या योजनेचा लाभ देण्यातही प्रशासनाकडून उदासिन धोरण अवलंबिले जात आहे. शासन एकीकडे मजुरांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी विविध योजना व कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिन भूमिकेमुळे केलेल्या कामाचा मोबदला मजुरांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मजुरांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. कामाची मजुरी मिळावी, यासाठी नेकराज सातपैसे व वैशाली सातपैसे यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. परंतु, सावली पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी मजुरी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून मजुरांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोखाळा येथील रोहयो मजुरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सात महिन्यांपासून रोहयो मजुरांचे वेतन रखडले
By admin | Published: November 18, 2014 10:53 PM