चंद्रपूर : कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्या हत्या प्रकरणात यापूर्वीच सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान रविवारी आणखी सात जणांना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे. आणखी एक फरार आरोपी किशोर चानोरे याचा शोध सुरू आहे.
रविवारी अक्षय मारोती रत्ने रा. नकोडा, मोहसीन नसीर शेख, अभिजीत उर्फ पवन मोरेश्वर कटारे, शेख नसिफ शेख रशीद, अखिल जमिल कुरेशी, नुर अहमद अब्दुल वहाब कुरेशी, पाचही जण रा. चंद्रपूर, सय्यद अबरार इंतसार अहमद, रा घुग्घुस यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर समीर शेख, प्रशांत मालवेणी, नीलेश उर्फ पिंटू ढगे या तिघांचीसुद्धा शनिवारी न्यायाधीशांनी चार दिवसांची म्हणजे २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी वाढविली आहे. तर श्रीकांत कदम, राजेश मुलकलवार, सुरेंद्र यादव या तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करीत आहेत.लोकेशन दिल्याने आणखी सात जणांना अटकपोलिसांनी हाजी हत्या प्रकरणात घटनेच्याच दिवशी काही वेळातच पाच जणांना अटक केली होती. दरम्यान पोलिस तपासात हाजी सरवरची हत्या कट रचून केल्याचे समोर आले. त्यामुळे पूर्वीच्या कलमामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६१ ची भर घालण्यात आली. तसेच आरोपी आदल्याच दिवशी आले होते. त्यामुळे त्या आरोपींना कुणीतरी शरण दिली. कट रचण्यात सहभाग घेतला असावा, लोकेशन दिली असावी, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्यांनी सखोल तपास करून रविवारी सात जणांना अटक केली आहे.