लोकमत न्यूज नेटवर्क नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर गावात नळयोजना ठप्प पडल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गुंडभर पाण्यासाठी महिलांवर भटकंतीची वेळ आलेली आहे.
गावामध्ये पिण्यासाठी गोड पाण्याचे स्रोत नसल्याने संपूर्ण गाव नळयोजनेच्या पाण्यावरच अवलंबून आहे. शिवणी उमा नदीवरून रत्नापूर गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. उन्हाळभर रत्नापूर गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून लोखंडी पाट्या लावून दरवर्षी बंधारा अडविला जायचा.
त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात उन्हाळ्यामध्येसुद्धा नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळायचे. मात्र या बंधारा अडविण्याच्या लोखंडी प्लेट अंदाजे किंमत ९ लाख रुपये चोरट्यांनी २ जुलै २०२३ च्या रात्री लंपास केल्या. ग्रामपंचायतीने पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांना आजही रत्नापूर येथील बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्याला शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे नदीचे पात्र लवकरच कोरडे पडले आणि आज त्याचा फटका रत्नापूर गावाला बसत आहे.
आतापर्यंत शेतातील बोअरचे पाणी घेऊन चार पाच दिवसांआड पिण्याचे पाणी कसेतरी मिळत होते. आता तेही आटल्याने ग्रामपंचायत हतबल झाली आहे. दरम्यान, रत्नापूर ग्रामपंचायतीने जोपर्यंत नदीला पावसाचे पाणी येणार नाही, तोपर्यंत नळयोजना बंद राहील, असे सांगून टाकल्याने पाणी कुठून आणावे, असा गंभीर प्रश्न रत्नापूरवासीयांसमोर निर्माण झाला आहे. आता गावात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे.
गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किवा हातपंप नाही. त्यामुळे गावाबाहेर शेतशिवारातील दोन किमी अंतरावरून महिलांना पाणी आणावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन टँकरने पाणीपुरवठा करावा.- सुनिता मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, रत्नापूर