विसापूर : बऱ्याच वर्षांपासून विसापूर येथील वाॅर्ड क्रमांक १ पूरबुडीत भागातील नांदगाव- विसापूर रोडच्या बाजूला सांडपाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाणी जाण्यास मार्ग नसल्याने त्या जागेवर डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले व त्यामध्ये डासांची पैदास वाढल्याने नागरिकांचे आरोग्यसुद्धा आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसरातील या समस्याबाबत नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन दिले. एका बाजूला शेती व दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती यामुळे पाणी जाण्यासाठी कुठेच मार्ग नाही. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्यमान आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नागरिकांनी साकडे घातले. त्यांनी याची स्वतः दखल घेऊन या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि त्याबाबतचे इस्टीमेंट बनवण्याचे आदेशसुद्धा दिले, परंतु पावसाळा येऊन ठेपला तरी कामात कोणतीच प्रगती नाही. नुकतेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गावात चांगलेच थैमान घातले; आता यावर उपाययोजना केली नाही तर डेंग्यू, चिकन-गुनिया, मलेरियाचे थैमान वाढू शकते. ही समस्या ओळखून प्रहार जनशक्ती पक्ष व स्वराज्य सामाजिक संघटनेने या समस्या सोडवण्याकरिता ग्रामपंचायतीने वरिष्ठाकडे पाठपुरावा करावा, याबाबत ग्रामप्रशासनाला निवेदन दिले.