फेसबुक, व्हॉट्सॲप आदी सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. या आधुनिक साधनांपासून माहिती व ज्ञान घेण्याऐवजी केवळ उथळ मनोरंजनासाठी वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मेसेज पाठविणे, लाईक करणे, व्हिडिओ शेअर करणे, फोटो अपलोड करणे असे प्रकार सुरू असतात. सोशल नेटवर्किंग साईटवरून कुठलाही विषय कमी वेळात पोहोचू शकतो. मात्र, अनेकदा याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. या माध्यमांवर टाकलेला आक्षेपार्ह मजकूर टाकून दोन गटांत तणाव निर्माण करू शकतो. अनेकजण काहीही न वाचता, समजून घेता आंधळेपणाने शेअर व लाईक करतात. यातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत.
बाॅक्स
अशी घ्या काळजी
फोटो, व्हिडिओ क्लिप व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट टाकणे, लाईक, शेअर, कॉमेंट, फॉरवर्ड करणे टाळावे. सोशल मीडियाचा वापर करताना कोणताही समाज, जात, धर्म व पंथाचा अपमान होणार नाही. व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी युझर्सनी घ्यावी.
बाॅक्स
अशी आहे शिक्षेची तरतूद
सोशल मीडियावर चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम २९५ (धार्मिक भावना दुखावणे) तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ व ६७ नुसार गुन्हा दाखल होतो. कायद्यानुसार त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
बाॅक्स
फेसबुक, व्हॉट्सॲपचा अतिरेक घातक
फेसबुक, व्हॉट्सॲपचा वापर करताना अतिरेक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विज्ञानाने दिलेल्या या साधनांचा आयुष्याच्या प्रगतीसाठी व सुसंवाद, विचारांच्या आदान-प्रदानासाठी वापरण्याची शिस्त आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस सायबर विभागाने केले.
मुलींनो डीपी सांभाळा
सोशल मीडियाचा तरुणवर्ग प्रचंड वापर करत आहे. तंत्रज्ञान वाढत चालले आहे तसे पूर्णत: गुंतत चाललो. सर्वात जास्त गैरवापर फेसबुकचा केला जात आहे. युवकांसोबत पालकांनाही स्वत:मध्ये बदल घडवावा. आपला मुलगा, मुलगी काय करतो त्याकडे पालकांचे लक्ष हवे. मुलींनी तर आपल्या डीपीपासून काळजी घ्यावी.
चंद्रपूर जिल्ह्यात सायबर गुन्हे वाढले
भामट्यांकडून ई-मेल व मोबाईलवर मेसेज पाठवून गंडा घालण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. वस्तू खरेदी-विक्रीच्या ऑनलाइन व्यवहारांची आधी खात्री करावी, असा सल्ला पोलीस प्रशासनाने दिला.
कोट
समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. त्यामुळे कोणतीही पोस्ट ही शहानिशा करूनच फारवर्ड करावी, अन्यथा आपणही गुन्ह्याच्या कचाट्यात अडकू शकतो. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाने जागृतीची व्याप्तीही वाढविली आहे. अनेक सायबर गुन्ह्यांचा भंडाफोड केला.
- कमलेश जयस्वाल, पोलीस निरीक्षक सायबर विभाग, चंद्रपूर