लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी दावे-प्रतिदावे करीत आहेत. अशातच वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीची अवघ्या २१ व्या वर्षी सरपंचपदी बिनविरोध वर्णी लागली, त्यामुळे गावातच नाही, तर परिसरात सर्वच तिचे कौतुक केले जात आहे. प्रतिभा शालीकराव मांडवकर असे सरपंच तरुणीचे नाव आहे. जिल्ह्यात सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून प्रतिभा मांडवकर असल्याचे बोलल्या जात आहे. ती ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आली आणि गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. गावातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावाच्या विकासाठी काम करणार असल्याचे तिने सांगतिले. भविष्यात समाजकार्य महाविद्यालयातून पदवी घेत आपले शिक्षणही पूर्ण करणार असल्याचे मत ‘लोकमत’सोबत बोलताना व्यक्त केले.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीप्रतिभा मांडवकर या मूळच्या शेगाव या गावच्या असून, आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) येथे बीएससी द्वितीय वर्षाला शिक्षण सुरू आहे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएचे शिक्षण सुरू आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही प्रतिभाने जिद्दीच्या भरवशावर अपक्ष उमेदवार म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज सादर केला होता. अपक्ष उमेदवार असतानाही गावातील पक्षांना, पॅनलला पराजीत करून विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलगी असलेल्या प्रतिभा यांची सरपंचपदी आता निवड झाली आहे.
माझ्या मनात नेहमीच समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी यावर्षी निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला. निवडणुकीत सर्व मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. त्यामुळे महाडोळी गट ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली. मी गावच्या विकासासाठी कटिबद्द असून, सर्वोतोपरी गावाचा विकास करणे हेच एक ध्येय डोळ्यासमोर आहे.- प्रतिभा शालीकराव मांडवकर, सरपंच महाडोळी ग्रामपंचायत,