अमोद गौरकार ।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला. अखेर तरूण पर्यावरणवादी मंडळ तसेच वनविभागाने योजना आखून त्या बछड्याला त्याच्या आईपर्यंत पोहचविण्यास मदत केली.ग्रामस्थांनी बछड्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिराऱ्यांनी त्याची तपासणी केली असता, तो ठणठणीत असल्याचे अहवाल दिला. आता मात्र वनविभाग आणि ग्रामस्थांना बछड्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न सतावत होता. त्याला इतरत्र सोडले तर तो उपासमारीने तसेच इतर प्राणी त्याला मारेल ही भीती होती. यानंतर तरुण पर्यावरणवादी मंडळ आणि वनविभागाने व्युहरचना आखली. ज्या ठिकाणी बछडा विहिरीत पडता होता. त्याच ठिकाणी त्याची आई येईल, असा अंदाज व्यक्त करून त्या विहिरीजवळ त्याला ठेवणे हा एकमेव पर्याय निवडण्यात आला. बछडा केवळ तीन ते चार महिन्याचाच असल्याने अनेक धोके होते. त्यामुळे त्याला भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आणि तो कॅरेट विहिरीजवळ रात्री आठ वाजताच्या दरम्यान ठेवण्यात आला. त्यानंतर वनविभाग तसेच पर्यावरणवादी मंडळाचे चमू लक्ष ठेवून होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी ती आली आणि तब्बल अर्धा तास निरीक्षण केल्यानंतर कॅरेटमधील बछड्याला अलगद उचलून जंगलात निघून गेली.वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल रूपेश केदार, वनरक्षक भैसारे, नवघडे, वनकर्मचारी प्रदिप ढोणे, जगू लांजेवार, सुनिल लांजेवार, रघू शेंडे, निलेश मुंगणे यांच्यासह तरूण पर्यारणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, विजय गजभे, मोरेश्वर पांगुळ तसेच मांगलगाव येथील नागरिकांनी यासाठी सहकार्य केले.मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. यामुळे मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. या प्राण्यांना पाणी तसेच अन्न मिळविण्यासाठी अन्नसाखळीतील इतर प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा हा संघर्ष आणखी वाढून तो जीवावर बेतणारा ठरू शकतो, तेव्हा सर्वांनीच जागृत होणे गरजेचे आहे
मातृत्वाच्या ओढीने तिला भेटला बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:37 PM
येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला.
ठळक मुद्दे२४ तासात भेटली आई : विहिरीत पडलेला बछडा सुखरूप