परिस्थितीमुळे शासन धोरणाला तिलांजली : हजेरीपटावर नाव मात्र शाळेला दांडीघनश्याम नवघडे नागभीडशाळेच्या दाखल खारिज रजिस्ट्ररवर भलेही त्यांची नावे असतील, पण ती शाळेची पायरी चढतच नाही. दररोज परिसरातील दोन-चार गावे फिरणे, आपली कला दाखविणे आणि कुटुंबाला मदत करणे हाच त्यांचा नित्यक्रम झाला आहे.हे ढळढळीत सत्य नागभीड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे पाहायला मिळते. किरमिटी येथे गोपाळ समाजाची तीन-चार घरांची लोकवस्ती असून त्यांची ६ ते १२ या वयोगटातील सहा-सात मुले आहेत. कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आणि शासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशिल असले तरी किरमिटीच्या या मुलांनी शासनाच्या या धोरणाला तिलांजली दिली आहे.मंगळवारी सकाळी येथील जुन्या बस स्थानकावर ही मुले हातात डफळी आणि ढोलक घेऊन दारोदार फिरत होती. डफडी व ढोलक वाजविणे आणि त्या तालावर गाणी म्हणणे, त्या बदल्यात उपस्थित लोकांकडून दोन-चार रुपये मागणे, हे त्यांचे काम. हे दृष्य सदर प्रतिनिधीच्या लक्षात आल्यानंतर अधिक चौकशी केली असता, ते कधीच शाळेत जात नसल्याची माहिती समोर आली. शिवाय आई-वडीलसुद्धा कधीच शाळेत जाण्याचा आग्रह धरत नाही, असेही ते म्हणाले. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना त्यांची नावे विचारली असता, नावे सांगितली. त्यांच्या वाघाडे या आडनावावरुन ती मुले एकाच कुटुंबातील असावीत. दरम्यान, येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी उपलंचीवार यांना याबाबत विचारणा करून त्यांची नावे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या यादीत आहेत का, असे विचारले असता, त्यांनी लगेच किरमिटीच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांची नावे हजेरी पटावर असल्याचे समजले. केवळ हजेरी पटावर नाव असणे म्हणजे ती मुले शाळाबाह्य नाही. पण जी मुले शाळेत जातच नाही, शाळेची पायरी चढतच नाही, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
‘ती’ मुले शाळेची पायरी चढतच नाही...
By admin | Published: July 12, 2015 1:15 AM