वरोरा : शेगाव (बु) पोलीस ठाणे पूर्वी वरोरा पोलीस उपविभागात होते. मात्र, ते आता चिमूर पोलीस उपविभागाला जोडण्यात आले. हे अंतर उलट फे-यांचे असून १०१ गावांना अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे ही गावे पूर्ववत वरोरा उपविभागातच समाविष्ठ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे भद्रावती- वरोरा निर्वाचन क्षेत्र अध्यक्ष व माजी नगरसेवक विलास नेरकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
शेगाव (बु) ठाणे हे वरोरापासून अवघ्या १८ कि.मी. अंतरावर आहे. शेगाव (बु) पासून चिमूरचे अंतर ३९ कि़. मी. येते. शेगाव (बु) अंतर्गत येणारे बोडखा ते शेगाव अंतर ५० कि. मी. तर बोडखा ते चिमूर ८९ कि.मी. आहे. भद्रावती तालुक्यातील गावांची परिस्थिती हीच आहे. शेगाव हे वरोरा तालुक्यात येते. कार्यालयीन कामाकरिता शेगाव ठाणे अंतर्गत नागरिकांना शासकीय कामाकरिता वरोरा येथे यावे लागते. उपविभागीय पोलीस कार्यालय चिमूर येथे झाल्याने नागरिकांना नाईलाजाने उलटफेऱ्याने जावे लागत आहे. त्यामुळे ही गावे वरोरा उपविभागातच समाविष्ठ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरकर यांनी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांची भेट घेऊन केली आहे.
बॉक्स
ग्रामपंचायतींनीही घेतला ठराव
शेगाव (बु) ठाणे अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींची नोंद आहे. वरोरा ३१, भद्रावती १२, चिमूर ६ अशी एकूण ग्रामपंचायती अंतर्गत १०१ गावे येतात. गावे पूर्ववत कायम ठेवण्यासाठी ४९ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतली. ३४ ग्रामपंचायतींनी ठराव पारित केले, अशी माहितीही नेरकर यांनी गृहमंत्र्यांना दिली.