आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : आयएसओ मानांकनप्राप्त शाळा, शाळासिद्धीमध्ये 'अ' श्रेणीत असणारी शाळा, शालेय परीसरात सुंदर बाग, बागेत फुलझाडे, फळझाडे व शालेय पोषण आहारात भाज्या व तितकीच सुंदर, गुणवत्ताधारी शाळेतील छोटी पाखरं. या शाळेतील मुलांना घडवताना तिने अक्षरश: जीवाचं रान केलं. परंतु आज शाळेला सोडून जाताना ती शिक्षिका ढसढसा रडली.होय ही वास्तवगाथा आहे जि. प. प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची. १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरित करण्याच्या शासन निर्णयाचा या शाळेला जबर फटका बसला आहे. जेमतेम आठ पटसंख्या असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक लहु नवले व शिक्षिका कांचन लांबट हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेत सुंदर फुलबाग व फळबाग फुलविली. शाळेची रंगरंगोटी केली व शाळेची गुणवत्ता वाढवून आयएसओ मानांकनासोबत शाळासिध्दीमध्ये शाळा 'अ' श्रेणीत आणली.शाळेची पटसंख्या आठ असली तरीही केंद्रस्तरावरील व तालुकास्तरावरील नवरत्न स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांचा हमखास क्रमांक असायचा. अशी ही परिश्रमाने घडवलेली शाळा सोडताना मुख्याध्यापक लहू नवले यांची पावले जड झाली होती. तर सहायक शिक्षिका कांचन लांबट यांना अश्रू अनावर झाले. त्या ढसढसा रडल्या. गावकऱ्यांनी तर शाळेला कुलूपच लावू दिले नाही. हसरी आणि टवटवित फुलांची बागही कोमेजून गेली होती.आमची शाळा आमच्या गावाची शान आहे. त्यामुळे शाळा बंद करू नये, यासाठी गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला. प्रत्येक विद्यार्थी व पालकांचे चेहरे कोमजलेले होते. गावातील शाळा सुरु झाली नाही तर नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराच जणू गेडामगुडावासीयांनी दिला आहे.कोरपना तालुक्यातील उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणून गेडामगुडा जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. येथील उपक्रम पाहुन इतर शाळांतील शिक्षकांनी व सामाजिक संस्थांनी भेटी दिल्या. गेडामगुडा या आमच्या १०० टक्के आदिवासी गावातील आदर्श शाळा बंद केल्याने आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे.- विठ्ठलराव गेडामज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच
'ती' शिक्षिका ढसढसा रडली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:47 AM
आयएसओ मानांकनप्राप्त शाळा, शाळासिद्धीमध्ये 'अ' श्रेणीत असणारी शाळा, शालेय परीसरात सुंदर बाग, बागेत फुलझाडे, फळझाडे व शालेय पोषण आहारात भाज्या व तितकीच सुंदर, गुणवत्ताधारी शाळेतील छोटी पाखरं.
ठळक मुद्देपटसंख्येचा फटका : गेडामगुडा जि. प. शाळेचे वेदनादायी वास्तव